मौनराग! मौनराग!! मौनराग!!!

on शनिवार, डिसेंबर १५, २०१२

मौनराग! मौनराग!! मौनराग!!

नुसतं घुमतंय डोक्यात! एखादी गोष्ट डोक्यात घुसणं म्हणजे काय ते या मौनरागाने दाखवलं आज... परत...

मौनराग वाचलं होतं. आवडलं होतं असं म्हणणं म्हणजे अंडरस्टेटमेंट. मात्र परवा ते अचानक समोर आलं परत आणि ते ही कसं...

काही काही क्षण क्वचित येतात, अचानक येतात... पण येतात तेव्हा अंगावर कोसळतात गिरसप्प्यासारखे. त्या आवेगात ना तो क्षण राहतो ना आपण राहतो शिल्लक! त्या क्षणाचा एक भाग बनून तो क्षण जगण्यात मजा असते... आणि त्या क्षणाची महती अशी की त्याच्याशी एकरूप व्हायला, त्यात वाहून जायला स्वतः प्रयत्न करावे लागतच नाहीत. मुंबईच्या लोकलसारखं... आपण नुसतं उभं रहायचं. बाकीचं काम गर्दी करते!

मौनराग! मौनराग!! मौनराग!!!

त्यात परत 'गहकूटं विसङितम्'...

***

परवा जी. ए. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात सचिन खेडेकरने 'गहकूटं विसङितम्' सादर केलं. ४५ / ५० मिनिटे हा माणूस सतत बोलत होता. पाठांतराची कसोटीच. रंगमंचावर एकटाच. नेपथ्यही नाही फारसे. एक छोटासा प्लॅटफॉर्म, त्यावर एक लाकडी खांब, त्यात एक कोनाडा आणि त्या कोनाड्यात एक कंदील... झालं नेपथ्य. एका कोपर्‍यात एक छोटंसं स्टूल. एवढ्या समग्रीवर सचिनने नुसता एक आख्खा वाडाच नव्हे, एक आख्खा जीवनप्रवास जिवंत केला. मी तो वाडा प्रत्यक्ष बघितला... रंगमंचावर.

तेव्हा पासून जे काही चालू आहे मनात, ते असं अनावर उसळी मारून बाहेर येतंय आत्ता. त्याला थोपवणं माझ्या हातात नाहीये. गरजही नाहीये.

***

एक लहान पाच सहा वर्षांचा मुलगा. शिक्षणासाठी लांब पाठवला जातो. त्याला न विचारताच घेतलेला निर्णय. त्याचं तर घराशी अतूट नातं, ते दुरावतं. घराच्या विरहाचे दिवस 'घर परत भेटेल सुट्टीत, सुट्टीपुरतं का होईना' या आशेवर काढलेले. एका सुट्टीत मात्र कळतं की घर सोडलंय कुटुंबाने... कायमचं. हा ही त्याला न विचारताच घेतलेला निर्णय! एवढ्याशा लहान मुलाला काय कळतं हो? त्याला काय भावनाबिवना असतात का? उगाच नसते लाड!!

मात्र हा मुलगा पुढे आयुष्यभर जळत आला. कधी तरी त्या घरात जाईनच या निश्चयाने. आणि तो गेलाही... ३८ वर्षांनंतर! आणि त्या घराचा निरोप घेऊन आला. एखाद्या सुहृदाचा घ्यावा तसा. तेव्हा कुठे ती तगमग शांत झाली.

***

"आयुष्यात इतक्या घरांमधून निवास केला. प्रत्येकाची आठवण वेगळी आहे. पण घर म्हटले की हेच घर आठवत असे. ते आता उरले नाही. वडील गेले. मग आई गेली. आता घर.

राजपुत्र सिद्धार्थाला बोधी प्राप्त झाली तेव्हा तो हर्षभराने उद्गारला, "सब्बा ते कासुका भग्गा, 'गहकूटं विसङितम्'". देहरूपी घराची सगळी सामग्री मोडली. घर कायमचे तुटले फुटले. मी मुक्त झालो. जन्ममरणाच्या फेर्‍यातून माझी सुटका झाली. तृष्णा, वासना, इच्छा, संस्कार इत्यादींच्या लिप्ताळ्याने ग्रासलेल्या मानवी जीवनाच्या भोक्तव्यातून मी सुटलो.

माझी जीवनाकडून एवढी मोठी आध्यात्मिक अपेक्षा नव्हती. तृष्णा, वासना, इच्छा, संस्कार मनाला चिकटून आहेतच. आणि ते आहेत म्हणूनच एक घरही मला हवे होते. मला ह्या कुठल्याही गोष्टींपासून मुक्ती नको होती. जे घर होते असे वाटले त्याचा सहवास प्रत्यक्षापेक्षा कल्पनेतच जास्त आला. पण त्यालाही इतके दिवस स्वप्नात जखडून ठेवून त्याचा आज अखेर निरोप घेतला. माझेही घर मोडले. पण मला आनंद नाही झाला सिद्धार्थ गौतमा!"


***

दीडेक तास मी एका तरल अवस्थेत होतो. म्हणावी तर जागृती म्हणावं तर काही तरी अगम्य अवस्था... एक संधिप्रदेश. कबीर म्हणतो तसं, 'हद अनहद के बीच मे रहा कबीरा सोय'.

त्याच अवस्थेत तो घरासारख्या सुहृदाचा घेतलेला 'निरोप' कुठेतरी खोल गेला, ट्रिगर झाला त्याचा आणि काही काही आठवत गेलं.

***

निरोप. एक अटळ घटना. Eventually, it all ends! Everybody, everything parts! आपल्यालाही ते माहित असतं. तरीही आपण माज करत राहतो. कोणत्या तरी तत्त्वज्ञानात, 'हे सगळं सोडायचं आहे हे माहित असूनही आपण माज करत राहतो हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे' असं भाष्यही आहे बहुतेक.

आजवर खूप निरोप घेतले. काही ठरवून... बरेचसे अनिच्छेने... अगतिकतेने.

***

आयुष्यातला पहिलाच निरोप घेतला तो वयाच्या पाचव्या वर्षी. अतिशय प्रेम करणार्‍या आजोबांचा. तो ही त्यांनी आग्रहाने घडवून आणलेला. योगी पुरूष. आयुष्यभर कर्मयोग जपला आणि अखेरी अखेरीस भक्तियोग. त्यांना मृत्यू कळला होता. स्पष्टपणे दिसला होता. त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. मला मात्र समोर येऊ नाही दिले. अडकला तर याच्यातच जीव अडकेल म्हणले. म्हणून शेवटच्या क्षणी हा समोर नको. त्या वयात 'निरोप घेतलाय आपण' हे कळायलाच काही वर्षे गेली. तो पर्यंत मी याच आशेवर की येतील कधी तरी परत!

***

सचिन खेडेकर पूर्ण ताकदीने सगळं मांडत होता. घर दाखवत होता, त्या मुलाचा भावप्रवास दाखवत होता... आणि एका क्षणी 'You can never go home again!' हे वाक्य आलं.

मला खोबार आठवलं.

***

अल-खोबारला गेलो. आयुष्यातले सोनेरी दिवस सुरू झाले. आणि एक दिवस संपलेही. निरोप घेतला. किंबहुना परिस्थितीवश तो घ्यावा लागला. लादला गेला. निरोप अटळ आहे याची परत जाणिव झाली. ही जाणिव होणं आणि हे अटळत्व हळू हळू पचत जाणं हा एक प्रवास आहे. जितका लवकर संपवाल तितकं सुख भाग्यात... खोबार सोडावं लागणं हा माझ्या या प्रवासातला एक मोठा टप्पा होता. खूप त्रास झाला होता. आजही झाडाचं रोपटं उपटवत नाही. घरात कुंड्यांमधलं तण माळी उपटतो, ते आवश्यक आहे हे माहितही आहे. मात्र मी अस्वस्थ होत असतो खोल कुठेतरी. कारण मातीत रूजल्यावर तिथून उपटून फेकलं जाणं काय आहे हे मी अनुभवलं आहे. साक्षात. ते कसं विसरलं जाईल?

मात्र या खोबारला परत जायचंच कधी तरी असा निश्चयही होता. ते सोपं नव्हतं. ज्या देशाचा व्हिसा मिळणं कर्मकठीण अशा देशातलं ते गाव. पण नियती खूप मजा मजा करत असते. गाव सोडल्यानंतर साताठ वर्षांनी अचानक ध्यानी मनी नसताना मी खोबारला पोचलो. मात्र ते माझं गाव नव्हतंच. मला ते भलतंच वाटू लागलं. अनोळखी. राहत्या घराचा जो रखवालदार सलाम ठोकत होता त्याने आत जाऊ नका असं नम्र पण ठाम शब्दात सांगितलं. त्याचं काही चूक नव्हतंच. अतिशय सैरभैर झालो.

मात्र नंतर सावरलो... घर, गाव माझ्या मनातच आहे हे लक्षात आल्यावर... मी भलतीकडेच शोधतोय हे लक्षात आल्यावर.

गाव तर आहे तिथेच आहे.....
नकाशातलं नकाशात,
मनातलं मनात.

( http://www.misalpav.com/node/5989 )

***

निरोप घेऊनही निरोप न घेता राहता येतं याची ट्रिक सापडली मला. आता काही काही निरोप नकोसे वाटत असले तरी पचतात मात्र! प्रवासाचा टप्पा!

***

Who the bloody hell says, You can never go home again!

You can!

You bloody well can! Just need to correct the approach!

***

अजून एक निरोप मला सतत खुणावत असतो. खुणावत असतो. म्हणजे, त्याचं भान सतत असतं मनात. अटळ, अमर, काँकरर ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्ज.... शेवटचा निरोप....

कसा असत असेल तो निरोप?

काय असतं त्या क्षणी मनात?

कसा असतो तो?

किंबहुना, कसा असेल तो?

शाळेच्या पहिल्या दिवशी आईला चिकटून बसलेल्या भेदरलेल्या पिल्लासारखा... की अतिशय सुंदर जेवण झाल्यावर, 'आता पुरे! पोट भरलं! तृप्त झालो! अन्नदाता सुखी भव!' असं म्हणत पानावरून उठून शांतपणे हात धुवून वामकुक्षीला जाणार्‍या आजोबांसारखा? माहित नाही...  पण कळेलच की एक ना एक दिवस.

***

समोर चंद्रकांत कुलकर्णी 'जातस्य हि ध्रुवो मृत्यु:' वाचत होता. And I, for one, could not have agreed more with Mr. Elkunchwar! He was putting my thoughts to words... splendidly...

***

पण मग त्या मृत्यूचे काय? मरणेच्छा, बिट्ट्या वगैरे ह्यांचे काय? तर मी काही आता उठून मृत्यूच्या दारात आपणहून जाऊन उभा राहणार नाही हे नक्की. जन्मभर त्याच्यावर प्रेम केले, त्याची वाट पाहिली. आता मीहून काही करणार नाही. मलाही काही अभिमान आहेच की नाही? इतके दिवस त्याने केला, आता मी करीन. प्रेमात असे चालतेच. दोस्त आहे तो आपला. त्याला असेच वागवले पाहिजे. मग कळेल. मग येईल झक्कत. जातो कुठे? आहे कोण त्याला तरी? येईल जेव्हा यायचे तेव्हा. जसे यायचे तसे. दारात उभा राहून ओशाळे हसेल तेव्हा आपण त्याला क्षमा करून टाकू व रवीबाबूंचे गाणे अगदी सुरात म्हणून दाखवू :

आजि झॉडेर राते तोमार ऑभिशार
प्रानशखा बाँधू रे आमार

***

मौनराग! मौनराग!! मौनराग!!!

बाहेर मौन... आत कल्लोळ... मौनराग!!!

(बोध)कथा

on शुक्रवार, सप्टेंबर २८, २०१२

मला ना हा बोधकथा प्रकार खूप म्हणजे भयानकच आवडतो. घेतला तर बोध, नाही तर नुसती कथा म्हणूनही वाईट नाहीच. हो की नाही? तसंही बघितलेत का तुम्ही बोधबिध घेणारे लोक कधी? पण ते जाऊ दे. आपण लक्ष नाही द्यायचं. गणपती ही बुद्धीची देवता आहे की नै? मग आपण बाता तरी करू बोध वगैरे घ्यायच्या. तर म्हणून या काही (बोध)कथा. आणि या गणपती उत्सव पेश्शल असल्यामुळे प्रत्येकाने रूचेल पचेल तो बोध घ्यावा ही विनंती मात्र नक्कीच आहे.

पण ते ही एक असोच... (हे 'असोच' सुद्धा आम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या बोधांमुळेच बरं का!)

भानगड

तर एकदा काय झालं, विक्रम आजही असा नेहमीसारखा स्मशानातल्या झाडाखाली गेला. किर्र अंधार होताच. वेताळही वाटच बघत होता. (इतक्या वर्षांनानंतर, विक्रम आणि वेताळ एकमेकांना खूप युज्ड टू झालेत, यु नो!) मात्र आता विक्रम वेताळाला खांद्यावर वगैरे घेत नाही. दॅट्स सो ओल्डफॅशन्ड! ते दोघेही आता रात्रीच्या अंधारात मस्तपैकी शतपावली करतात. सुखदु:खाच्या चार गोष्टी बोलतात. रिस्पेक्टिवली, राणी आणि हडळीमुळे होणारा त्रास शेअर करतात एकमेकांशी. आणि स्वस्थपणे घरी जातात. किती वर्षं ते प्रश्न विचारायचे, डोक्याची शंभर शकलं करायची धमकी द्यायची? सो बोरिंग, यु नो!

पण, आज मात्र विक्रम खूपच अस्वस्थ होता. वेताळाच्याही ते लक्षात आलेच होते म्हणा. पण विक्रमाची ती ठसठस त्याने आपणहून व्यक्त करावी याची वाट बघत तो निवांतपणे गवताची काडी चघळत, इकडच्या तिकड्याच्या गप्पा मारत चालत राहिला. शेवटी विक्रम मुद्द्यावर आलाच. वेताळाच्या खांद्यावर हात टाकत तो म्हणला,

"यार वेताळ, काय साली ही दुनिया आहे राव! एक नंबर हरामखोर %&^#$^* !!!"

वेताळ जरा चपापला. मामला संगीन है! विक्रम एकदम अपशब्दांवर उतरला म्हणजे नक्कीच हे यडं काहीतरी उग्गाच मनाला लावून बसलंय.

"अबे! शिव्या काहून द्यायलास बे? काय झालं ते नीट वट्ट सांग भौ."

"यार आत्ता इथे येत असताना एक नवरा बायको आणि एक गाढव रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले बघ मला."

"आत्ता? इतक्या रात्री? साला हे स्मशान इथून जवळ आहे हे माहित नाही त्यांना? कमाले!"

'त्या नवराबायकोची थोडी गंमत करावी का?' या विचारात वेताळ पडला. विक्रमाला ते कळले.

"अरे छोड ना यार! आधीच बिचारे दु:खी वाटले. डोक्याला हात लावून बसले होते बघ. मी विचारायला गेलो तर बोलेचनात."

"च्याबायलीच्या, आस्सं? काय झालं काय असं?"

"अरे तेच विचारत होतो. खूप छेडलं तेव्हा कळली भानगड."

"काय ती?"

"तो त्या नदीपल्याडच्या गावातला कुंभार होता. सकाळी बायकोला घेऊन बाजाराला गेला होता. तिथे त्याने एक गाढव विकत घेतलं. आणि बाजार उरकून यायला लागले दोघे परत. गाढव होतंच बरोबर. उन्हाचा कडाका होता, तलखी लागत होती, दहा पावलं चालणं कठीण होत होतं म्हणून याने बायकोला गाढवावर बसवलं. तेवढेच श्रम कमी तिला."

"मग?"

"मग काय? तेवढ्यात समोरून काही पोरं आली. गावातली उनाड पोरं रे, काही काम ना धाम, उगाच लोकांची चेष्टा करत फिरणं हाच उद्योग. त्यांनी त्या बाईला म्हणलं की, 'बये, नवरा म्हणजे साक्षात परमेश्वर! त्याला पायी चालवतेस आणि स्वतः गाढवावर बसतेस? कुठे फेडशील हे पाप?'"

"अरारारा! काय बेनं रे हे? मग काय बाई उतरली का गाढवावरनं?"

"आता कोणती बाई हे असं झाल्यावर गाढवावर बसेल? उतरलीच ती. आणि आणाभाका घालून तिने नवर्‍याला गाढवावर बसवलं. पुढे चालू लागले तर वाटेत दुसरी काही माणसं भेटली त्यांना. ते तर त्या कुंभाराला मारायला धावले. त्यांचं म्हणणं की एवढ्या उन्हात बाईला पायी चालवून हा स्वतः मारे गाढवावर बसून चाललाय. त्यांनी त्याला उतरवलाच खाली."

"ही बलाच झाली म्हणायची की रे! मग पुढे?"

"पुढे काय! दोघंही वैतागले. त्यांनी ठरवलं की आपण दोघंही बसू गाढवावर. म्हणजे कोणी बोलायचा प्रश्नच नको. बसले की दोघेही गाढवावर. तर त्यांना अजून काही लोक भेटले रस्त्यात. त्यांनी तर अक्षरशः चार ठेवूनच दिल्या त्या कुंभाराला."

"आँ! आणि त्या का म्हणून?"

"म्हणे दोन माणसांचा भार त्या बिचार्‍या मुक्या जनावरावर टाकला ना रे त्यांनी... ते गाढव पार वाकलं होतं ओझ्याने. मग मार खाल्ल्यावर दोघेही हबकलेच. आता काय करावं हेच त्यांना समजेना बघ, मग त्यांनी ठरवलं की आता आपण दोघांनीही चालायचं, कोणीच बसायचं नाही गाढवावर."

"म्हणजे आधी जसं होतं तसं. बॅक टू स्क्वेअर वन!"

"हो! पण अजून थोड्या वेळाने त्यांना परत काही जण भेटले आणि त्यांनी तर यांना वेड्यात काढलं... हसायला लागले ते यांना. काय तर म्हणे, एवढं गाढव बरोबर असताना कोणीच त्याच्यावर बसलं नाहीये, एवढ्या ऊन्हात पायीच चालतायेत दोघं."

"हाहाहाहा! तूफान विनोदीच सिच्युएशन की!"

"तेव्हापासून ते दोघंही आता काय करावं म्हणून जे बसलेत रस्त्याच्या कडेला ते अजून बसले आहेत. काय करावं त्यांना कळत नाहीये. गाढवावर बसावं तरी पंचाईत, न बसावं तरी पंचाईत. मलाही विचारलं त्यांनी काय करू म्हणून. मला काहीच सुधरेना बघ. चूपचाप सटकलो तिथून. तूच सांग बा वेताळा! काय करावं त्यांनी? कोणाचं ऐकावं?"

"काय साला जमाना आलाय! आजकाल तूच मला गोष्टी सांगायलास बे! आणि उत्तरं पण एक्स्पेक्ट करतोस! हॅहॅहॅ!"

"जा बे, भाव नको खाऊ! नीट सांग. मी पण चक्रावलोय बघ. साला, जगात सल्लागारच सगळे. आणि एकाचं ऐकावं तर दुसरा नावं ठेवतो आणि दुसर्‍याचं ऐकावं तर तिसर्‍याला राग येतो. कटकटच आहे राव!"

"अरे बाबा! अगदी सोप्पंय रे, आय मीन, म्हणलं तर सोप्पंय. म्हणलं तर बेक्कार कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन. जगात शहाणे, दीडशहाणे, अतिशहाणे भरपूर भेटतात. जग म्हणजे वेड्याचा बाजार आहे. पण बेसिकली अशा परिस्थितीत दोन पर्याय असतात."

"कोणते?"

"सांगतो."

***

पर्याय.१

नेहमीप्रमाणे, एक राजा असतो आणि त्याचा एक प्रधान असतो. ऑफ कोर्स तो प्रधान अगदी विश्वासू, मित्रवत इ.इ. असतो. दोघे एकदा असेच गप्पा मारत असतात. तेवढ्यात राजवाड्यासमोरून एक साधू चाललेला असतो. राजा त्याला आत बोलावतो आणि त्याचा आदर सत्कार करतो. साधू खुश. तो राजाला म्हणतो,

"हे राजन! तू माझा इतका आदर केलास तर मी आता तुला काही देणं लागतो. तर ऐक, आजपासून बरोब्बर १५ दिवसांनी या गावात एक वादळ येणार आहे. ते जादूचं वादळ असणार आहे. त्याचं वारं ज्याच्या कोणाच्या कानात जाईल त्याला वेड लागेल." एवढं बोलून साधू निघून गेला. राजा आणि प्रधानाची जाम फाटली. आता काय करायचं? दोघांना काही सुचेना. शेवटी रिवाजाप्रमाणे प्रधानाला एक युक्ति सुचली.

"सरकार, आपण एक काम करू. आपण एक एकदम एअरटाइट खोली बांधू आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्यात वादळ यायच्या आधीच जाऊन बसू. वादळ थांबलं की बाहेर निघू. शिंपल!"

राजा खुशच खुश. खोली वगैरे बांधून झाली. ठरल्याप्रमाणे वादळ आलं. वादळाची चाहूल लागताच हे दोघे आपापल्या फ्यामिलीसकट खोलीत गेले आणि दार घट्ट लावून घेतलं. थोड्यावेळाने वादळ शमलं. सगळं काही स्थिरस्थावर झाल्याची खात्री करूनच राजा आणि प्रधान खोलीबाहेर पडले. बघतात तर काय, बाहेर राज्यातले बाकीचे सगळेच लोक वेडे झाले होते. नुसता धिंगाणा चालू होता. कुणी नाचत होतं, कुणी गात होतं, कुणी रडत होतं, कुणी कपडे फाडत होतं. हे दोघेही बघतच राहिले. खोलीत जाताना हे असं होईल हे लक्षातच आलं नव्हतं त्यांच्या. हताशपणे दोघेही बाकीच्या पब्लिककडे बघत बसले. एक दोघांना त्यांनी समजवायचाही प्रयत्न केला. काही फरक पडला नाही. उलट हे दोघे आपल्यासारखे वागत नाही म्हणून लोकच त्यांच्या अंगावर धावून आले. हे दोघे घाबरले आणि त्यांनी परत खोलीत धाव घेतली. दार आतून लावून घेतलं आणि विचार करू लागले. ऑफ कोर्स, आयडिया प्रधानालाच सुचली.

"हुजुर, आता एकच उपाय दिसतो आहे. सगळे जसं वागतायेत ना, आपणही तसंच वागायचं."

"म्हणजे! आपणही वेडं व्हायचं? काय बोलताय काय तुम्ही प्रधानजी? कळतंय का तुमचं तुम्हाला तरी?" राजा ओरडला.

"अगदी बरोबर, अगदी हेच म्हणतोय मी. आणि महाराज, शहाणपण म्हणजे तरी काय? चारचौघे जसे वागतात तसं वागणं म्हणजे शहाणपण. आज शहाणपणाची व्याख्याच बदलली आहे. आपण निमूटपणे ते नवीन शहाणपण मान्य करायचं आणि कातडी बचावायची."

"अहो पण..."

"आता पण नाही नी बिण नाही... जीव वाचवायचा असेल तर एकच मार्ग... एऽऽऽ नाचोऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड"

***

"वेताळा आलं बरं लक्षात! If you cant help it, then just jump in and enjoy it! त्रास नाही करून घ्यायचा, असंच ना?"

"करेक्ट! स्मार्ट आहेस."

"पण आता दुसरा काय ऑप्शन."

"अरे तो तर खूपच सोपा आहे. सांगतो. ऐक."

***

पर्याय.२

राजा, त्याचा तो मित्रासारखा प्रधान, राजवाडा, निवांत गप्पासेशन, साधू वगैरे वगैरे सेमच बरं का. मात्र इथे साधू रस्त्याने चूपचाप जायचं सोडून ओरडत चाललेला असतो,

"सुखी जीवनाचा मूलमंत्र, फक्त एक रूपयात! सुखी जीवनाचा मूलमंत्र, फक्त एक रूपयात!"

हे ऐकून राजा पेटतोच. च्यायला मी एवढा मोठा राजा आहे तरी अजून सुखी नाही आणि हा साधू चक्क सुखी होण्याचा मंत्र विकतोय, तोही फक्त एक रूपयात? तो साधूला बोलावतो आणि एक रूपया देतो.

"आता बोला बाबाजी, काय आहे तो मंत्र!"

"हे राजन, नीट ऐक... तो मंत्र आहे 'जो भी होता है भले के लिए होता है'... दॅट्स ऑल!"

साधू निघून जातो.

राजा चक्रावतो. पण काय करणार! एका रूपया अक्कलखाती गेला असं म्हणून तो गप्प बसतो.

बरेच दिवस जातात. राजा हे सगळं विसरूनही जातो. परत एकदा एका निवांत संध्याकाळी राजा अँड प्रधान अगेन रिलॅक्स करत असतात राजवाड्याच्या बागेत. फळं वगैरे पडलेली असतात समोर. गप्पा मारता मारता राजा एक सफरचंद घेतो कापायला आणि बोलायच्या नादात स्वतःचं बोट कापतो. ही धार लागते रक्ताची. बोटाचा तुकडाच पडलेला असतो. सगळीकडे बोंबाबोंब सुरू होते, गोंधळ होतो. राजा ओरडत असतो, विव्हळत असतो. कोणी मलम आणायला धावतो कोणी पट्टी आणायला धावतो. प्रधान राजाला शांत करायचा प्रयत्न करायला लागतो. आणि तो बोलून बसतो,

"महाराज, साधूने काय सांगितलं होतं? 'जो भी होता है भले के लिए होता है'. यातूनही काही चांगलंच होईल बघा. शांत व्हा!"

राज क्रोधायमान वगैरे होतो. साला मला एवढं लागलंय आणि हा असलं काय काय ज्ञान देतोय. प्रधानजीची रवानगी तडकाफडकी तुरूंगात होते. राजाची मलमपट्टीही होते. काही दिवसांनी त्याचं बोटही बरं होतं. रुटीन लाइफ सुरू होतं. आणि एक दिवस राजा शिकारीला जातो. हरणाचा पाठलाग करता करता तो भरकटतो आणि बरोबरच्या सैन्यापासून दूर जातो. अशा अवस्थेत तो जंगलात हिंडत असतो. तेवढ्यात काही आदिवासी त्याला पकडतात आणि त्यांच्या गावात त्याला घेऊन जातात. आपल्या नायकापुढे त्याला उभं करतात. नायक असा रूबाबदार माणूस बघून खुश होतो. नाही तरी देवीला बळी देण्यासाठी माणूस शोधतच असतो तो. हा मस्त भेटलाय! यालाच बळी देऊ, असा विचार करतो तो. मग काय, बळी द्यायची तयारी सुरू होते. बळी द्यायच्या आधी राजाच्या शरीराचं निरीक्षण होतं आणि त्यात नेमकं ते तुटकं बोट त्यांना दिसतं. खलास! असा बळी चालत नसतो. राजाला सोडून देण्यात येतं. राजा आपल्या राज्यात परत येतो, आणि थेट तुरूंगात जाऊन प्रधानाला मुक्त करतो. साधूचं म्हणणं त्याला पटलेलं असतं. प्रधानाची क्षमाही मागतो राजा.

"मित्रा, मला माफ कर. आता मला पटलं बघ, 'जो भी होता है भले के लिए होता है'! पण एक समजत नाहीये मला, इतके दिवस तू तुरूंगात खितपत पडलास त्यात तुझं काय भलं झालं? त्रासच झाला की तुला."

"हुजुर, असं कसं? हे बघा, मी तुमचा जिवलग मित्र आहे. तुमच्याबरोबर सावलीसारखा असतो. त्या दिवशी जंगलात आपण दोघे बरोबर असतो आणि दोघेही पकडले गेलो असतो. आणि माझं काही बोट वगैरे तुटलेलं नाहीये महाराज, तेव्हा तुमच्यानंतर माझाच नंबर लागला असता ना?"

***

"हाहाहा! ग्रेट! ग्रेट! वेताळा ही गोष्ट तर अप्रतिमच रे! जे चाललंय ते ठीकच चाललंय असं म्हणायचं आणि शांतपणे बघत रहायचं. दुनियेला करू दे काय फालतूपणा करायचा तो, आपण निवांत गंमत बघायची, असंच ना?"

"अगदी! अगदी! कळले तुला! मर्म कळले. अरे दुनिया बोलत राहणार, पाहिजे तसं वागत राहणार, आपण लोकांच्या वाटेला नाही गेलो तरी मुद्दाम येऊन टोचे मारणारे खूप असणार. आपण आपली शांती ढळू द्यायची नाही बघ. त्यांना हसून, गंमत बघायची. मनावर घ्यायचं नाहीच. उलट यातूनही काही चांगलंच निघेल असा भरवसा ठेवायचा."

"थँक्स वेताळा! आत्ता जातो आणि त्या कुंभाराला सांगून येतो."

"जरूर. पण एक अजून सल्ला... त्या कुंभाराला त्याने काय करावं ते न सांगता फक्त या दोन गोष्टी सांगून ये. मग तो आणि त्याची बुद्धी! जे काय करायचं ते त्याचं त्यालाच ठरवू देणे इष्ट! काय समजलास?"

"ऑफ कोर्स!"

विक्रम गावाकडे वळला आणि वेताळाने पिंपळाकडे झेप घेतली.

बडबड

on बुधवार, सप्टेंबर १२, २०१२

"ए हळू रे!"

"काय हळू? अशीच मजा येते!"

"म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?"

"नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?"

"ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!"

"आणि तू माझी गाय"

"पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!"

"ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना."

"नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?"

"हा हा हा"

"जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!"

"काही नाही होत गं... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"बघ तरी तुला सांगत होते... हळू चालव, हळू चालव."

"हो गं! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी."

"आता समजून काय उपयोग! त्या दिवशी समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच वळणावर येऊन हीच बडबड करायची अंतहीन पाळी नसती आली आपल्यावर."